नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर थेट “ मत चोरी ” चा गंभीर आरोप केला. राहुल गांधींचा दावा होता की, आयोगाच्या मदतीने भाजपाने कर्नाटक, महाराष्ट्रासह काही राज्यांत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली. त्यांनी एकाच पत्त्यावरून नोंदवलेल्या बोगस मतदारांची यादी पत्रकार परिषदेत मांडत, मतदार संख्येत झालेल्या संशयास्पद वाढीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राहुल गांधींच्या या बॉम्बनंतर त्वरित सत्ताधाऱ्यांकडून जोरदार पलटवार झाला. भाजपचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी त्यांच्यावर तिखट टीका केली. तर निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांना “ नवीन बाटलीतील जुनी दारू ” असे संबोधत राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.
या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी राहुल गांधींच्या मुद्द्याला उघडपणे समर्थन दिले. “निवडणूक आयोगाला जर या आरोपांवर आक्षेप असेल तर त्यांनी ‘ दूध का दूध आणि पानी का पानी ’ करून स्पष्ट उत्तर द्यावे,” असे पवार म्हणाले. त्यांनी आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत, “ राहुल गांधींवर शपथपत्र देण्याची सक्ती चुकीची आहे. आरोप निवडणूक आयोगावर झाले आहेत, त्यामुळे उत्तर आयोगाकडून हवे, भाजपाकडून नव्हे,” असा टोलाही लगावला.
राहुल गांधींच्या ‘मत चोरी’च्या आरोपाला आणि शरद पवारांच्या थेट ललकारीला एकत्रितपणे पाहता, विरोधकांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, दिल्लीतील राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
—————————————————————————————–