कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
राहुल बजाज हे भारतातील एक प्रतिष्ठित उद्योजक, राजकारणी आणि समाजसेवक होते. भारतातील उद्योग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी १९६५ मध्ये बजाज ग्रुपचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.५ कोटींवरून १२ हजार कोटीं रुपयेपर्यंत वाढली. बजाज चेतक स्कूटर हे त्यावेळी भारतीय मध्यमवर्गाचे प्रतीक बनले. आजही बजाज चेतक बाईक जोरात चालते. त्यांच्या कार्यामुळे ते “हमारा बजाज” या घोषवाक्याचे खरे प्रतीक ठरले. आज राहुल बजाज यांचा जन्म दिवस यानिमित्त…
राहुल बजाज यांचे जीवन आणि कार्य हे भारतीय उद्योगजगतातील प्रेरणादायक उदाहरण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ग्रुपने अभूतपूर्व यश मिळवले. परकीय कंपन्यांच्या प्रभावाखाली न जाता, त्यांनी स्वदेशी उत्पादनांवर भर दिला.
राहुल बजाज यांनी त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या बजाज ऑटो कंपनीचे नेतृत्व करताना भारतात दुचाकी वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवले. त्यांनी बजाज स्कूटर (विशेषतः “हमारा बजाज”) हे नाव घराघरात पोहोचवले. यामुळे भारतीय मध्यमवर्गासाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह वाहनांचा पर्याय निर्माण झाला. १९७० आणि ८० च्या दशकात भारतात परदेशी गुंतवणूक मर्यादित असताना, राहुल बजाज यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवले. त्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक उत्पादनावर भर दिला आणि आयातीवर अवलंबित्व कमी केले. त्यांनी आत्मनिर्भर भारताची सुरुवात केली. बजाज कंपनीच्या जाहिरात मोहिमांमधून राहुल बजाज यांनी भारतीयांच्या मनात एक अभिमानाची भावना निर्माण केली. “हमारा बजाज” ही टॅगलाईन केवळ स्कूटरसाठी नव्हती, तर ती भारतीय स्वदेशी उत्पादकतेचे प्रतीक बनली. राहुल बजाज हे नुसतेच यशस्वी उद्योजक नव्हते, तर नैतिकता आणि पारदर्शकतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ग्रुपने फक्त नफा न पाहता सामाजिक जबाबदारीही स्वीकारली.
राहुल बजाज यांचे योगदान केवळ व्यवसायापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी भारतीय मानसिकता, आत्मनिर्भरता आणि स्वदेशी चळवळीला एक औद्योगिक दिशा दिली. ते खऱ्या अर्थाने स्वदेशी उद्योगांचे शिल्पकार मानले जातात.






