कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राधानगरी तालुक्यातील काँग्रेसमध्ये राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अस्वस्थता वाढली असताना, गुरुवारी तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी कोल्हापुरात आ. सतेज पाटील यांची भेट घेऊन काँग्रेसमध्येच राहण्याची भूमिका स्पष्ट केली. ही भेट पक्षासाठी ‘डॅमेज कंट्रोल’ची मोठी संधी ठरली आहे.
राधानगरी तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पूर्वी पासून दोन गट आहेत – दिवंगत पी. एन. पाटील गट व आ. सतेज पाटील गट. विशेषतः भोगावती नदीकाठच्या परिसरात पी. एन. पाटील गटाचे प्रभावी अस्तित्व आहे. याच गटातील काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आ. सतेज पाटील यांच्याशी गुरुवारी साळोखेनगर (कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये भेटले.
या भेटीत ‘भोगावती’ साखर कारखान्याचे विद्यमान संचालक हिंदुराव चौगले, रवींद्र पाटील (तारळेकर ), माजी संचालक ए. डी. पाटील, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, ‘छ. राजाराम’ चे माजी संचालक सुधाकर साळोखे, सुशील पाटील ( कौलवकर ), जि. प. माजी सदस्य पांडुरंग भांदिगरे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, चंद्रकांत चौगले, रमेश बचाटे पाटील, विलासराव पाटील, दिगंबर येरुडकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
तसेच ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, आर. के. मोरे, ‘छ. राजाराम’चे माजी उपाध्यक्ष एल. एस. पाटील, शंकरराव फराकटे, शिवाजीराव आदमापुरे, जयवंत पाडळकर यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित होते.
आ. सतेज पाटील– राधानगरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागे मी ठामपणे उभा राहीन, अशी ग्वाही दिली. त्यांनी राहुल पाटील यांच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यावर भर दिला असून संघटन मजबूत ठेवण्यासाठी विविध स्तरांवर बैठकांना सुरुवात केली आहे.
राधानगरी तालुक्यातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेली ही स्थिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी निर्णायक ठरू शकते. राहुल पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे केवळ गटबाजीचा परिपाक आहे की तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
———————————————————————————