नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्व भारतीयांचे आभार मानले आणि संविधानाच्या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. राधाकृष्णन याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी.सुदर्शन यांचा पराभव केला.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडही उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
सी. पी. राधाकृष्णन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव मोठा आहे. उपराष्ट्रपती या पदाच्या माध्यमातून ते देशाच्या विधीमंडळातील दुसऱ्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत.हा शपथविधी सोहळा देशातील राजकीय एकतेचे प्रतिक ठरला असून, उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी नव्या उपराष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या.
चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन – सी.पी. राधाकृष्णन यांचा जन्म ४ मे १९५७ या दिवशी झाला. राधाकृष्णन हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते २०२३ पासून ते २०२५ पर्यंतझार्खान्द्चे १० वे राज्यपाल होते. सध्या ते महाराष्ट्रचे राज्यपाल आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते आणि कोईम्बतूर मधून दोनदा लोकसभेचे खासदार झाले आहेत. ते तमिळनाडूचे भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते. ९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी ठरले आहेत.