कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केवळ आमदार, विधानपरिषद सदस्य, त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच विधानसभा परिसरात प्रवेशाची परवानगी दिली जाईल, याचबरोबर अन्य सर्वांवर अधिवेशन काळात नो एंट्री असा नियम केला असून नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नार्वेकर यांनी दिला आहे. नार्वेकर यांनी असे प्रकार परत घडू नयेत म्हणून नितीमूल्य समिती नेमण्याचे जाहीर केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या चालू अधिवेशनादरम्यान काही आमदारांच्या अनुचित वर्तनामुळे निर्माण झालेल्या अप्रिय परिस्थितीवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, विधीमंडळ ही एक पवित्र संस्था आहे. येथे होणाऱ्या चर्चांचे आणि आमदारांच्या वर्तनाचे देशभरात आणि राज्यात बारकाईने निरीक्षण केले जाते. त्यामुळे आमदारांनी सभागृहात वावरण्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नितीमूल्य समिती नेमणार : या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, विधीमंडळाच्या परंपरा आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी आमदारांवर आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे वर्तन सभागृहात मर्यादित, सभ्य आणि शिष्टशुद्ध असणे आवश्यक आहे. यामुळेच विधानसभेतील शिस्त व नैतिक आचारधर्म यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर ‘नितीमूल्य समिती‘ गठीत केली जाणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
राहुल नार्वेकर यांनी पुढे सांगितले की, या समितीच्या स्थापनेचा निर्णय येत्या एका आठवड्याच्या आत घेतला जाईल. समितीचे स्वरूप, तिच्या कार्यपद्धती, अधिकार आणि जबाबदाऱ्या यासंबंधी लवकरच अंतिम रूपरेषा ठरवली जाईल. समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सभागृहातील नैतिक आचारसंहिता निश्चित करणे व ती काटेकोरपणे लागू करणे हे असेल.
याआधीही सभागृहात गोंधळ, घोषणाबाजी आणि व्यक्तिगत टीका या कारणांमुळे कार्यवाही अनेकदा थांबवावी लागली आहे. त्यामुळे ही समिती म्हणजे विधीमंडळातील सुसंस्कृत राजकारणाच्या दिशेने एक पाऊल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
—————————————————————————-