शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या : इंडिया आघाडीची मागणी

0
202
Provide immediate financial assistance of Rs 50,000 per hectare to farmers; India Front demands
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत द्या; अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आली. अवकाळी पावसामुळ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

अवकाळी पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आली. याबाबत खासदार शाहू महाराज आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली.

यावेळी मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात मे २०२५ मध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीसह इतर क्षेत्रांमध्ये नुकसान झाले. या पावसामुळे शेतमालांचे, घरे, जनावरे तसेच रस्ते आणि पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक वाया गेले असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी. त्याचबरोबर राज्य शासनाने अवकाळी पावसाला ‘राज्य विशेष नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वार्षिक अनुदानाच्या १०% पर्यंत निधीचा वापर करून अशा आपत्तीमधील बाधित नागरिकांना तात्काळ मदत पुरविणे शक्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाधित क्षेत्राचे आणि इतर घटकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरीकांना आर्थिक मदत द्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, शेतकऱ्यांच मोठ नुकसान होऊनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत. केवळ राजकारणावर चर्चा होतात. विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची भूमिका आम्ही मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी, खासदार शाहू महाराज यांनी, पडझड झालेल्या घरांची त्याचबरोबर शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली. शिष्टमंडळामध्ये, माजी आमदार राजूबाबा आवळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी.एन. पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेते, संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजय देवणे, आर के पोवार, महादेवराव आडगुळे, दिलीप पवार, संदीप देसाई, सुनील मोदी, क्रांतिसिंह पवार, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, अतुल दिघे, अनिल घाटगे, सुनिल देसाई, बाजीराव पाटील त्यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here