कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टीमुळे तब्बल ३५२ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर करून, नैसर्गिक आपत्ती मदत निधीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच बियाणे व खते अनुदानावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
कोल्हापूरच्या विकासकामांसाठीही महत्त्वाच्या मागण्या केल्या. शासनाने अनेक विकासकामांना मंजुरी दिली असली तरी निधी न मिळाल्याने ती कामे रखडली असून, तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
आमदार पाटील यांच्या प्रमुख मागण्या
-
वीज दरवाढीमुळे कोल्हापुरातील उद्योजक कर्नाटकात स्थलांतर करत आहेत ; यावर शासनाने निर्णय घ्यावा.
-
कोल्हापूर शहरातील रस्ते, ड्रेनेज व पाणीपुरवठा खुदाईमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी निधी द्यावा.
-
कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १३० कोटींचा निधी मंजूर करावा.
-
अंबाबाई मंदिर विकास आराखडा व राजर्षी शाहू महाराज स्मारक आराखड्याला गती द्यावी.
-
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उर्वरित निधीची तरतूद करावी.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, उद्योग टिकवणे आणि विकासकामांना गती देणे ही वेळेची गरज आहे. त्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.
——————————————————————————————————