कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात सर्किट बेंच स्थापन झाले असून, येथील ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली आहे. वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढीचा विचार करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि भविष्यदृष्टी ठेवून करावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यासाठी नियोजन विभागांतर्गत येत असलेल्या प्रमुख विकास प्रकल्पांना आवश्यक निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही नागरिकांच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या किरणोत्सव प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देऊ नये. मंदिर परिसर आणि आतील नूतनीकरणाची कामे करताना नैसर्गिक दगडांचा वापर करावा आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील शासकीय निर्णयानुसार मंत्रिमंडळात ठरलेल्या बदलांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, आपण त्यावर स्वाक्षरी करू, असे त्यांनी सांगितले. अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासह जोतिबा आणि पन्हाळा येथील शिवतीर्थ यांच्या विकासासाठी चांगले नियोजन करून प्रस्तावित कामांचे विस्तृत सादरीकरण करावे. प्रस्ताव योग्य असल्याची खात्री पटल्यानंतर तातडीने निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रस्तावित आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथील जागेचा आढावा घेण्यात आला. सर्किट बेंचमुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली असून, विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. त्यादृष्टीने भविष्यातील विस्ताराचा विचार करून प्रत्येक कामाची गुणवत्ता आणि नियोजन लक्षात घेऊन कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच शाहू मिल येथील प्रस्तावित शाहू स्मारकासाठी वस्त्रोद्योग महामंडळाकडून जागा हस्तांतरणाबाबतही त्यांनी तातडीने प्रक्रिया राबविण्यासाठी दूरध्वनीवरुन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांच्याशी चर्चा केली.




