नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्यातील ब्राझील भेट विशेष ठरली. ६ आणि ७ जुलै रोजी रियो डी जेनेरियो येथे पार पडलेल्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ब्रासिलिया येथे पोहोचले, जिथे त्यांचे भव्य आणि पारंपरिक स्वागत करण्यात आले. ब्रासिलिया विमानतळावर पंतप्रधान मोदींचे आगमन झाले, त्यावेळी ब्राझिलियन सांबा रेगे नृत्य सादर करून त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे या स्वागत समारंभात भारतीय संस्कृतीचे दर्शनही घडले. शिव स्तोत्र, गणेश वंदना आणि पारंपरिक भारतीय संगीताच्या पार्श्वभूमीवर स्वागताचे स्वर घुमले. या क्षणी भारत-ब्राझील सांस्कृतिक मैत्रीचे एक सुंदर चित्र उभे राहिले.
सर्वोच्च नागरी सन्मान
ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डी सिल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस” या ब्राझीलच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. हा सन्मान भारत-ब्राझील यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य, जागतिक पातळीवरील सामंजस्य, आणि नेतृत्वगुणांचे प्रतीक मानला जातो.
द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती लूला यांच्यात व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, कृषी, आरोग्य, औद्योगिकीकरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी सखोल चर्चा झाली. यावेळी अनेक महत्त्वाचे करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आले, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले आहे.
ब्रिक्स संमेलनातील प्रभावी सहभाग
रियो डी जेनेरियो येथील ब्रिक्स शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी प्रभावी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी जगभरातील महत्त्वाच्या नेत्यांशी गहन चर्चा केली. भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विश्वसनीय भागीदार म्हणून ओळख मिळवून देणारे हे संमेलन ठरले, अशी माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.
—————————————————————————————–