कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
देशातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या “प्रधानमंत्री किसान मानधन योजना” च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना शेतकऱ्यांना वृद्धा अवस्थेत दरमहा ३,००० रुपये पेन्शन देण्याची हमी देते. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत सुद्धा सुरू राहते. त्यामुळे एका शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण ४२ हजार रुपयांचा सरकारी लाभ मिळू शकतो.
केंद्र सरकारच्या कृषी धोरणामध्ये पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम किसान मानधन योजना या दोन योजना महत्त्वाच्या ठरल्या आहेत. सन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत तीन समान हप्त्या मध्ये दिली जाते. याशिवाय मानधन योजनेअंतर्गत वयोमानानुसार अंशदान करणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यावर अजीवन दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळते. वर्षाच्या हिशोबाने ही रक्कम ३६ हजार रुपये इतकी होते.दोन्ही योजनांचा एकत्रित विचार केल्यास शेतकऱ्याला दरवर्षी ४२ हजार रुपयांचा थेट लाभ मिळतो.
मानधन योजनेच्या वैशिष्ट्या पैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचे खाते आधीपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेत आहे, त्यांना मानधन योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करावी लागत नाही. सन्मान निधी योजनेत नोंदणी करताना सादर केलेले कागदपत्रे मानधन योजनेसाठी ग्राह्य धरली जातात. शिवाय सन्माननिधीतून मिळणाऱ्या रकमेतील काही भाग अंशदानासाठी वापरण्याची सुविधा दिली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगळा परिणाम भरावा लागत नाही.
१८ ते ४० वयोगटातील कोणताही लघु अथवा सीमांत शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो. त्यानंतर साठ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनाही पेन्शन सुरू होते. सरकारने ही योजना शेतकऱ्यांच्या वृद्धावस्थेतील जीवन अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राबवली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळावर – www.pmkisan.gov.in येथे उपलब्ध आहे. या योजनेतून मिळणारा लाभ दीर्घकालीन असून योग्य नियोजन आणि वेळेवर नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून मोठा आधार मिळतो. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आपला भविष्यकाळ सुरक्षित करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे



