कोल्हापूर : प्रतिनिधी न्यूज
जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार झाला आहे. या पुलामुळे काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. १३० वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवून या पुलाचे उद्घाटन केले. २७२ किमी लांबीचा उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग देशाला समर्पित केला. चिनाब पुलाच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या, तरी २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे स्वप्न साकार झाले आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक २७२ किमीचा आहे. या रेल्वे मार्गावर ३६ बोगदे आहेत, ज्यांची लांबी ११९ किमी आहे. रेल्वे मार्गावर ९४३ रेल्वे पूल आहेत. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर जास्त उंच आहे. हा पूल -१० डिग्री सेल्सियस ते ४० डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान सहन करू शकतो. या पुलाची क्षमता १२० वर्षांपर्यंत आहे. ४० किलोपर्यंतच्या टीएनटी स्फोटकांचाही या पुलावर काही परिणाम होणार नाही. ८.० तीव्रतेच्या भूकंपाने देखील या पुलाला कोणताही धोका होणार नाही. २६० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वादळ देखील या पुलाचे नुकसान करू शकणार नाही. पुलाचा प्रत्येक भाग ६३ मिलीमीटरच्या ब्लास्ट-प्रूफ स्टीलने बनवलेला आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू आणि श्रीनगर रेल्वे मार्गावर बनलेल्या चिनाब ब्रिजला एक इंजिनीअरिंग मार्बल म्हटले आहे. या पुलाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, “याचे डिझाइन खूप किचकट आहे आणि त्याचे फाउंडेशन अर्ध्या फुटबॉल मैदानाएवढे आहे आणि त्यात ३० हजार टन स्टील लागले आहे. तसेच, ते म्हणाले की हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे.”