कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांतून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरातील महाद्वार रोड, राजारामपुरी, शाहूपुरी शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकांनांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र, यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतींनी पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १० टक्के दरवाढ झाली आहे. विशेषतः वह्या, पुस्तके, बॅग्ज, कंपास पेट्या, वॉटर बॉटल्स, शूज-सॉक्स यांसारख्या वस्तूंमध्ये ही दरवाढ जाणवते आहे. महाद्वार रोडवरील एका व्यापाऱ्याने सांगितले की, ‘‘गेल्या वर्षी ज्या वह्यांचा संच ५४० रुपयांत मिळत होता, तो यंदा ५०० ते ६०० रुपयांपर्यंत गेला आहे.तसेच स्कूल बॅग्स, शूज-सॉक्स, कंपास पेट्या, वॉटर बॉटल्स यांचे दरही १०० ते १५० रुपयांनी वाढले आहेत.
यंदा अभ्यासक्रमात काही प्रमाणात बदल करण्यात आल्याने अनेक विक्रेत्यांनी जुनी पुस्तके घेणे थांबविले आहे. परिणामी, जुन्या पुस्तकांची मिळकत कमी झाली असून नव्या पुस्तकांचे संच खरेदी करणे अनेक पालकांना भाग पडले आहे.
खासगी शाळांमधील पालक अधिक अडचणीत
शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके दिली जातात. त्यामुळे तेथील पालकांना काहीसा दिलासा मिळतो. मात्र, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तक संच, स्टेशनरी, बॅग्ज, शूज-सॉक्स यासाठी पालकांना मोठा खर्च करावा लागत आहे. आधीच शेतीमालाचे भाव पडल्याने व खरीप हंगामासाठीची तयारी सुरु असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांसाठी शालेय खरेदी डोकेदुखी ठरत आहे.
कच्चा माल महागल्याचा परिणाम
कापूस, कागद व इतर कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे वह्या व पुस्तके महागली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र काही विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ऑफर्सही दिल्या आहेत.
शालेय साहित्य हा जीवनावश्यक गोष्टींमध्ये समाविष्ट करून त्यावरील कर सवलती द्याव्यात, अशी मागणी व्यापारी व पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
——————————————————————————————–