वाघापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वाघापूर येथील श्रीक्षेत्र जोतिर्लिंग देवस्थानाची वार्षिक नागपंचमी यात्रा मंगळवारी (ता. २९ जुलै) पार पडणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या उत्साहात जय्यत तयारी सुरू असून, भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समिती, प्रशासन व राज्य परिवहन महामंडळाने विशेष नियोजन केले आहे.
या यात्रेची सुरुवात पहाटे पाच वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा व काकड आरतीने होणार आहे. त्यानंतर दर्शन मंडपात प्रतिष्ठापित केलेल्या नागमूर्ती व श्री जोतिर्लिंग देवाचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात येईल.
यंदा नव्याने उभारले जात असलेले श्री जोतिर्लिंग मंदिर हे पारंपरिक हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्राच्या आधारावर, काळ्या बेसाल्ट दगडात व चुण्याच्या बांधकामात हेमाडपंथी शैलीत उभारले जात आहे. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने सध्या देवाची प्रतिष्ठापना ज्योतिर्लिंग सांस्कृतिक गृहाच्या बाहेरील बाजूस करण्यात आली आहे.
भाविकांच्या मोठ्या गर्दीची अपेक्षा लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने जादा बसेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. कूर–वाघापूर–आदमापूर फाटा या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून, पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. तसेच, मंदिर परिसरात विशेष दर्शनरांगेची सुविधा व इतर मूलभूत सोयी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जोतिर्लिंग-भैरवनाथ यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह इतर भागांतून हजारो भाविक वाघापुरात दाखल होणार आहेत. धार्मिक भक्ती, सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण उत्सव यांचा संगम असलेली ही यात्रा भाविकांसाठी एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.
————————————————————————————-



