नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि युनायटेड किंगडम ( यूके ) दरम्यान एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार ( Free Trade Agreement – FTA) होणार आहे. हा करार दोन्ही देशांतील व्यापारी संबंधांमध्ये एक नवा अध्याय घडवणारा ठरणार असून, त्याचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांवर दिसून येणार आहे.
मुक्त व्यापार करार म्हणजे काय ?
मुक्त व्यापार करार म्हणजे दोन देशांमध्ये विशिष्ट वस्तू आणि सेवांवरील आयात-निर्यात कर ( सीमाशुल्क ) कमी करणे किंवा पूर्णपणे रद्द करणे. यामुळे दोन्ही देशांची उत्पादने एकमेकांच्या बाजारपेठेत स्वस्तात पोहोचू शकतात. भारत-यूके FTA अंतर्गत भारतातून यूकेला जाणाऱ्या ९९% उत्पादनांवर कोणताही कर लागू होणार नाही, तर भारत यूकेमधून येणाऱ्या ९०% वस्तूंवरील करात कपात करणार आहे.
ग्राहकांसाठी या वस्तू होतील स्वस्त
-
मोबाईल, लॅपटॉप आणि गॅझेट्स –इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात शुल्कात कपात झाल्याने किमती घटतील.
-
फॅशन उत्पादने ( शूज, कपडे ) – शून्य किंवा अत्यल्प करामुळे याचे दर कमी होण्याची शक्यता.
-
दागिने – यूकेमधून येणाऱ्या मौल्यवान दागिन्यांवरील कस्टम ड्युटीत कपात होणार.
-
चामड्याची उत्पादने – जॅकेट्स, बॅग्स, शूज यासारख्या वस्तू स्वस्त होतील.
-
काही औषधे – भारत-यूके औषध व्यापारामुळे काही औषधांचे दर कमी होतील.
यामुळे महाग होऊ शकतात
-
लक्झरी कार आणि बाईक – करात सवलत मिळाल्यामुळे महागड्या वाहनांची मागणी वाढू शकते, परिणामी बाजारभाव चढू शकतो.
-
धातू व स्टील उत्पादने – यूकेमधून उच्च दर्जाचे धातू आयात झाल्यास स्थानिक उत्पादकांवर दबाव येणार, दर वाढू शकतात.
-
काही औषधे – जिथे भारत यूकेकडून औषधे आयात करतो, तिथे काही उत्पादनं महाग होण्याची शक्यता.
कृषी क्षेत्राला संरक्षण
FTA मध्ये भात, गहू या सारख्या कृषी उत्पादनांना सध्या कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन या क्षेत्रात कर कपात टाळली आहे.
रोजगाराच्या संधी भारताला मोठा फायदा
हा करार भारतीय उत्पादन, कापड, सागरी व दागिने क्षेत्रासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. यूकेच्या मोठ्या बाजारपेठेत या उत्पादनांना सुलभ प्रवेश मिळणार असून, निर्यातीत वाढ होऊन नवीन रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे.
भारत-यूके FTA म्हणजे केवळ व्यापाराचा करार नसून, तो एक सामान्य माणसाच्या दैनंदिन खर्चापासून ते देशाच्या रोजगार धोरणापर्यंत परिणाम करणारा निर्णय आहे. या कराराचे अधिकृत स्वाक्षरी सोहळ्यानंतर, लागू होणाऱ्या अटी आणि लाभांची अधिक सविस्तर माहिती उपलब्ध होईल.
—————————————————————————————-



