पंढरपूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
येत्या ६ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात विठ्ठल-रखुमाईची महापूजा होणार आहे. यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार विठ्ठल-रखुमाई साठी खास पोशाख तयार करण्यात आले आहेत. सुप्रसिद्ध वस्त्रकार तुषार भोसले यांनी या खास वस्त्रांची निर्मिती केली आहे.
रखुमाईसाठी खास पैठणी साडी तयार करण्यात आली आहे. तर पांडुरंगासाठीही अत्यंत देखणा आणि आकर्षक पोशाख बनवण्यात आला आहे. हे दोन्ही पोशाख पूर्णपणे रेशमी कपड्यांतून तयार करण्यात आले आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते हे पोशाख विठ्ठल-रखुमाईला अर्पण करण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना तुषार भोसले म्हणाले, “६ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक, राज्याच्या १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून पांडुरंग आणि रुख्मिणी मातेची महापूजा करणार आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच महापूजा असल्याने त्यांच्या वतीने हा खास पोशाख तयार करण्यात आला आहे.”
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या आषाढी वारीला जगभरातून लाखो भाविक दरवर्षी येतात. अशा पावन पर्वावर विठ्ठल-रखुमाईला विशेष पोशाख परिधान करून सजवले जातात. यंदाचा पोशाख अत्यंत आकर्षक, रेशमी आणि पारंपरिकतेची जपणूक करणारा असून, भाविकांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
——————————————————————————————



