कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आरं पावसा, तुझ्याकडं अजून चार महिने हाईत, आताच का एवढा पडाय लागलाईस… असं खुळ्यागत का कराय लागलाईस…आजचं टार्गेट पूर्ण केलं पाहिजे असं काय हायं का….जरा थांब बाबा. एवढं श्यात पेरू दे….अशी आर्त हाक बळीराजाची सुरू झाली आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासनं कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालीया. या पंधरा दिवसात पावसाचा लईच जोर वाढलाय. यामुळं शेतशिवारं पाण्याखाली गेल्यात. औतं करायची राहिल्यात. बियाणं तर काही भागात पेरणीयोग्य जमीन चिखलात फसलीया.आज मंगळवार सकाळ पासनं पावसानं काही ठिकाणी उघडीप दिलीया. असचं उघडझाप आणखी काही दिवसा राहिली तर बरं हुईल…असं वाटायं लागलंय.
राज्यात रविवारी (दि. २५) तळकोकणात मान्सून दाखल झाला असतानाच, कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये आधीच मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील उन्हाळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यात २३ मेपर्यंत साधारणतः ३२ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. यामध्ये ऊस, भाजीपाला, मका, घेवडा यांसारख्या पिकांचा समावेश असून याचे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
दुसरीकडे, राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर ४२५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मात्र, हवामान विभागाने आणि कृषी विभागाने इशारा दिला आहे की, मान्सून ची वाटचाल पुढे मंदावू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी राज्यात १५६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार, खते आणि बियाण्याचे नियोजन सुरू असून शासकीय यंत्रणाही सज्ज आहे. पण अचानक आलेल्या पावसामुळे सर्व नियोजन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला :
-
अजून पेरणीस घाई करू नका
-
आपल्या भागात वाफसा कधी येईल याचा अंदाज घ्या
-
हवामान खात्याचे अपडेट्स लक्षात ठेवा
-
मान्सूनची पुढील वाटचाल कशी राहणार याचा अंदाज घेऊनच पुढची कृती ठरवा
अमरावती, जळगाव, नाशिकला सर्वाधिक तडाखा –
मान्सून पूर्व म्हणजे ५ ते २१ मे या दरम्यान झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले आहे. तेथील १२ हजार २९५ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. यात मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्र्याचा समावेश आहे. त्याखालोखाल जास्त नुकसान जळगाव व नाशिक जिल्ह्यांत झाले आहे. जळगाव भागातील साडेचार हजार हेक्टरवरील मका, ज्वारी, भाजीपाला, बाजरी, ज्वारी, कांदा, केळी, पपई व कांद्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याच्या १२ तालुक्यांना मान्सून पूर्व पावसाने तडाखा दिला आहे. तेथील ३१०० हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. यात बाजरी, मका, डाळिंब, आंबा, कांदा, भाजीपाला पिकांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ११४६ हेक्टर, जालना १७२६ हेक्टर, बुलडाणा २७५८ हेक्टर, चंद्रपूर १२२० हेक्टर तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशीव, सातारा, सोलापूर, पुणे, नंदूरबार, धुळे व रायगड जिल्ह्यांतील उभ्या पिकांची हानी झाली आहे.
घात येण्यासाठी वाट पहावी लागणार :
राज्यात मान्सून अगोदरच्या पावसानं काही भागांत कापसाच्या अर्ली लागवडीला खीळ बसलीये. शनिवार-रविवार (ता. २४-२५) जोरदार पाऊस झाल्यानं तब्बल ४२५ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झालीये. त्यामुळे आधीची पिकं हातची गेलीत आणि नव्या पेरण्यांची तयारी देखील खोळंबलीये.
या पावसाचा झटका कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक भागांतील शेतकऱ्यांना बसलाय. १ ते २४ मे दरम्यान मान्सून पूर्व पाऊस झाला आणि २५ मेनंतर खरी मान्सूनसुद्धा काही भागात दाखल झाली. त्यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनाची बारा वाजलेत.
कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय की, सध्या ज्या ठिकाणी अतिपाऊस झालाय तिथं जमिनीत वाफसा यायला अजून ८ ते १० दिवस लागतील. म्हणजेच, शेतकऱ्यांना अजून काही दिवस थांबावं लागणार आहे. शेतात पेरणं करायचं म्हणजे माती वाफशीर लागते, पण सध्या ती अक्षरशः चिखलात बदललीये.
जर चालू आठवड्यात पावसाचा थोडा फार खंड पडला, तर परिस्थितीत बदल होईल. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणी करण्याआधी मान्सूनचा पुढचा अंदाज बघून निर्णय घ्यावा, असंही कृषी खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. कारण एकदा पेरणी केली आणि पुन्हा पावसाने ओहोटी घेतली, तर नुकसान आणखी वाढणार.
मान्सून ची वाटचाल मंदावण्याची भीती –
राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार, यंदा मान्सून २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला असून तो सामान्य तारखेपेक्षा तब्बल १२ दिवस आधीच आलेला आहे. मात्र, आजपासून (ता.२७) पुन्हा मान्सून च्या प्रवासाची गती कमी होणार आहे. यातून राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार चालू आठवड्यात राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल व काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. चालू आठवड्यात कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती किमान पाच जूनपर्यंत कायम राहण्याचा असल्याचा अंदाज आहे. यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून पसरण्याची शक्यता दिसत नाही. मान्सून आधी येऊन नंतर पुन्हा खंड पडण्याचा अनुभव यापूर्वी २०२३ मधील खरिपात राज्याने घेतला आहे. त्यावेळी विमा योजनेतील अडीच हजार महसूल मंडलांपैकी एक हजार मंडलांमध्ये कमी पाऊस झाला होता. २०२३ मध्ये १५५ तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे खरिपाचे नुकसान झाले होते. नेमकी तशीच स्थिती चालू खरिपात उद्भवण्याची भीती काही कृषी अधिकाऱ्यांना वाटते आहे.
—————————————————————————————-



