आंबोली (सिंधुदुर्ग) : प्रसारमाध्यम न्यूज
दरवर्षी जून-ऑगस्टमध्ये पर्यटकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या आंबोलीत यंदा लवकरच पर्यटन हंगाम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य आंबोली परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे येथील प्रसिद्ध धबधबा प्रवाहित होऊ लागला आहे.
धबधबा प्रवाहित झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा हिरवळ फुलली असून, निसर्ग सौंदर्याची मोहिनी अधिकच खुलली आहे. यामुळे स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यवसायिक आणि गाइड्स यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असून, लवकर आलेला पाऊस ही स्थानिकांसाठी दिलासादायक बाब ठरत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी “दरवर्षी जूनमध्ये हंगाम सुरू होतो, पण यंदा लवकर आलेल्या पावसामुळे अपेक्षेपेक्षा आधीच पर्यटकांची आवक होऊ लागली आहे. हे आमच्यासाठी अत्यंत सकारात्मक लक्षण असल्याचे सांगितले.
आंबोलीच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक आधीच येथे येण्यास सुरुवात करत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाने सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छता यावर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. आंबोलीमधील या धबधब्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरणात रममाण होण्यासाठी पर्यटकांची आतुरता दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत येथे पर्यटनाचा जोरदार भर पडण्याची शक्यता आहे.
आंबोली वर्षा पर्यटनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. परिसरातील आंबोली, गेळे आणि चौकुळ ही तीन गावे नयनरम्य निसर्गसौंदर्य, घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे आणि जैवविविधतेसाठी वर्षा पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत. दरवर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह देशभरातून लाखो पर्यटक आंबोलीचा पाऊस, धुके आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. पावसाळ्यातील पहिलेे दोन-तीन महिने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते.
काय बघाल…
आंबोली घाटातील प्रसिद्ध धबधबे, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ, महादेव गड पॉईंट, वनबाग, फुलपाखरू उद्यान यांसारखी विविध पर्यटनस्थळे वर्षा पर्यटकांना खुणावत असतात. या व्यतिरिक्त गेळे येथील कावळेसाद पॉईंट आणि चौकुळमधील विविध पर्यटन स्थळे देखील पर्यटकांना आकर्षित करतात. स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे.
वन विभागाचा पुढाकार :
आंबोलीतील वर्षा पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, आ.दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने वन विभागाने पर्यटकांना पर्यटनस्थळांची सैर घडवण्यासाठी दोन वाहने सज्ज ठेवली आहेत. ही वाहने वन व्यवस्थापन समितीच्या ताब्यात देण्यात आली आहेत, ज्यामुळे पर्यटकांना आंबोली परिसरातील निसर्गाचा अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल.
लवकरच वर्षा पर्यटन :
आता मान्सून कोकणात दाखल झाला असून रविवार पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जमिनीत पाणी मुरून झरे प्रवाहित होण्यासाठी असा हलका परंतु संततधार पाऊस महत्वाचा असतो. मान्सूनपूर्व पाऊस दमदार कोसळल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहित झाले आहेत. आता मान्सूनच्या आगमनामुळे लवकरच हे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतील व आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामास प्रारंभ होईल. सध्या आंबोलीमध्ये दाट धुके आणि रिमझिम पावसाचे वातावरण आहे. आता मृग नक्षत्र सुरू होताच आंबोलीमध्ये वर्षा पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
——————————————————————————————-