पंढरपूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांच्या सहयोगी नेत्यांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण, आर्थिक निर्णय आणि राजकीय कृती यावर जोरदार प्रहार करत ‘ देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे,’ असा गंभीर इशाराही दिला.
सिंदूर ऑपरेशनमध्ये रशियासारखा मित्र गमावला
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडे कोणीही नव्हते. रशिया सारखा पारंपरिक मित्रही आपल्यापासून दुरावला. भाजप व मोदींची भाषा ही रशियावर उपकार केल्यासारखी आहे, त्यामुळेच रशियाने पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत लोखंडी कारखाना सुरू करून दिला.”
मोदींमुळेच टॅरिफ वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवले आहे, यालाही आंबेडकरांनी थेट मोदींच्या धोरणांना जबाबदार धरले. “या टॅरिफचा मोठा फटका भारताच्या वस्त्रोद्योगाला बसणार असून, या क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढेल. भविष्यात आपल्याला डॉलर विकत घ्यावे लागतील, आणि मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
देश दिवाळ खोरीच्या उंबरठ्यावर
आंबेडकरांनी मोदींवर सडकून टीका करत सांगितले की, “देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. उलाढालीत आपण चौथ्या क्रमांकावर असलो तरी आतली परिस्थिती ढासळलेली आहे. देश वाचवण्यासाठी १४० कोटी जनतेतून कुणीतरी पुढे आलं पाहिजे.”
शरद पवार हे भाजपाचे हस्तक
राज्याच्या राजकारणातील इतर महत्त्वाच्या नेत्यांवरही प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. “ शरद पवार हे भाजपाचे हस्तक आहेत. त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच बंद केला आहे. रामदास आठवले हे फक्त नावापुरते आरपीआयचे आहेत, आज ते फक्त भाजपचे मंत्री आहेत. आरपीआय कुठेच शिल्लक नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
सुप्रीम कोर्ट निर्णय बदलणार नाही
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील न्यायालयीन वादांबाबत विचारले असता, “ सुप्रीम कोर्ट एकदा दिलेला निर्णय कधी बदलते का ? त्यामुळे आता ठाकरे आणि पवार यांच्या गटांना झटका बसणार हे निश्चित आहे. विधानसभेत शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने अधिक मतदान झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीत मोठी उलथापालथ?
प्रकाश आंबेडकरांनी शेवटी एक महत्त्वाचा राजकीय संकेतही दिला. “ पुढील १५ दिवसांत इंडिया आघाडी बाबत एक वेगळी बातमी येणार आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यातील आणि देशपातळीवरील राजकीय समीकरणांमध्ये कोणते नवे वळण येणार, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मुद्देसूद, ठाम आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चा आणि घडामोडींना सुरुवात झाली आहे. त्यांच्या भूमिकेकडे केवळ राजकीय प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर संभाव्य दिशा दाखवणाऱ्या संकेतांप्रमाणे पाहण्याची गरज आहे.
——————————————————————————————————