लास वेगास : वृत्तसेवा
भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पुन्हा एकदा बुद्धिबळ विश्वाला आश्चर्याचा धक्का देत माजी जागतिक क्रमांक एक मॅग्नस कार्लसनला पराभवाची चव चाखवली आहे. फ्री स्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम टूरच्या लास वेगास स्पर्धेत प्रज्ञानंदने ही लक्षणीय कामगिरी करत टॉप ब्रॅकेटच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं आहे.
चौथ्या फेरीत प्रज्ञानंदने केवळ ३९ डावांत आणि १० मिनिटं १० सेकंदात कार्लसनला मात दिली. या सामन्यात त्याची अचूकता ९३.९ %, तर कार्लसनची केवळ ८४.९ % इतकी होती. या पराभवाचा कार्लसनवर इतका परिणाम झाला की पुढच्या फेरीत तो अमेरिकेच्या वेस्ली सोकडून देखील पराभूत झाला. परिणामी, आणखी एक अमेरिकन खेळाडू लेव्हॉन एरोनियॉनने कार्लसनला स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर ढकललं.
गौरवाची गोष्ट म्हणजे, या स्पर्धेत केवळ प्रज्ञानंद नव्हे, तर आणखी एक भारतीय बुद्धिबळपटू डोममाराजू एरिगासी याने देखील उत्तम कामगिरी करत दुसऱ्या गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
आता उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदचा सामना अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना, तर एरिगासीचा सामना उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी होणार आहे. दोघांनाही मजबूत प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार असला तरी आतापर्यंतच्या कामगिरीवरून भारतीय खेळाडूंना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
याआधी मॅग्नस कार्लसनने पॅरिस आणि कार्ल्स्रुए येथे पार पडलेल्या फ्रीस्टाईल ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. मात्र लास वेगासमधील स्पर्धेत त्याचा प्रभाव क्षीण पडल्याचे स्पष्ट दिसून आले.भारतीय बुद्धिबळाला मिळालेली ही घौडदौड निश्चितच अभिमानास्पद आहे. प्रज्ञानंद व एरिगासी या दोघांच्या कामगिरीमुळे भारताची बुद्धिबळ क्षेत्रातील पकड अधिक बळकट होताना दिसते आहे.
————————————————————————————-



