कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जगप्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड ‘प्राडा’ आणि पारंपरिक कोल्हापुरी चप्पल यांच्यातील वाद आता निवळण्याच्या मार्गावर आहे. प्राडा कंपनीने कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांशी करार करण्यास सकारात्मक भूमिका घेतली असून, दोन्ही बाजूंमध्ये सहकार्याची नवी दारे उघडण्याची शक्यता आहे.
अलीकडेच प्राडा कंपनीचे एक शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये दाखल झाले. त्यांनी कोल्हापुरी चप्पल निर्मिती करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली आणि चपलांची पारंपरिक निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. चपलांमध्ये वापरले जाणारे कच्चे साहित्य, हस्तकला कौशल्य आणि विविध डिझाइन्स याची सविस्तर माहिती घेतली. प्राडाच्या चार व्यक्तींच्या शिष्टमंडळात कंपनीचे एक संचालक, एक मॅनेजर आणि दोन सल्लागार यांचा समावेश आहे.
या भेटीनंतर प्राडा कंपनीकडून आणखी एक टीम लवकरच कोल्हापूरमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये संभाव्य सहकार्य, ब्रँडिंग, आणि उत्पादन भागीदारी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरी चप्पल हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असून, त्याचे जागतिक स्तरावर संरक्षण व प्रचार करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरू शकतो. स्थानिक कारागिरांसाठी ही संधी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे.



