मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. निलंबनानंतर आज काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते नाना पटोले पुन्हा सभागृहात हजेरी लावणार असून, त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. विरोधकांकडून आज ड्रग्ज तस्करी, शाळांचे नियोजन, एसटी महामंडळाची दुरवस्था यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे.
नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
एका दिवसाच्या निलंबनानंतर नाना पटोले आज सभागृहात हजेरी लावणार असून, त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की सरकारच्या धोरणांवर आणि मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर ते जोरदार टीका करतील. त्यामुळे आजचे अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.
एसटीची दुरवस्था आणि शिक्षण चर्चेत
राज्यातील एसटी महामंडळाच्या आर्थिक आणि व्यवस्थापकीय दुरवस्थेवरून सरकारला प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच, शाळांचे नियोजन, शिक्षणाच्या गुणवत्तेचा मुद्दा यावरही विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत.
ड्रग्ज तस्करी
राज्यात ड्रग्ज तस्करीच्या वाढत्या घटनांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, बदलापूर आणि वसईत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
-
मे महिन्यात नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीच्या घटना उघडकीस आल्या.
-
जून महिन्यात औरंगाबाद आणि बदलापूर येथे चहाच्या टपऱ्यांवरून अमली पदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या.
-
वसईत साकीनाका पोलिसांनी तब्बल ८ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले.
-
ठाणे जिल्ह्यात २ कोटी २१ लाख रुपयांची एमडी ड्रग्ज पावडर हस्तगत करण्यात आली.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सभागृहात सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शिराळा नागपंचमी
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ऐतिहासिक नागपंचमी सणाला पुन्हा जिवंत नाग पूजेस परवानगी देण्याची मागणी आमदार सत्यजित देशमुख आज विधानसभेत करणार आहेत. देशमुख यांचे म्हणणे आहे की, देशात जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली आहे, त्यामुळे नागपंचमीच्या पारंपरिक पूजेला परवानगी मिळाली पाहिजे. या मागणीवरही सभागृहात चांगलीच चर्चा होण्याची शक्यता आहे.
———————————————————————————-



