मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात सिंगल युज प्लास्टिक मुळे अत्यंत प्रदूषण होत असून यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार कारवाई केली आहे. मात्र, हे प्लास्टिक तयार करणाऱ्या बहुतांश कंपन्या या गुजरातमधील असून त्यांच्याद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या अशा प्लास्टिकमुळे महाराष्ट्रात प्रदूषण वाढत असल्याची कबुली, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिली आहे.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मुंबईतील मिठी नदीची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मिठी नदीला तिच्या मूळ रूपात आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील आणि विशेषता मुंबईतील प्रदूषणाचे मुख्य समस्या म्हणजे सिंगल युज प्लास्टिक आहे. नुकतेच पुणे येथे पाच टन प्लास्टिक जप्त केले असून प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यभरात सर्वत्र ही कारवाई सुरू आहे. भाजीवाल्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्याऐवजी आम्ही हे प्लास्टिक कोणी त्याच्यापर्यंत पोहोचवले आणि कोणी उत्पादित केले हे शोधून त्यांच्यावर कारवाई करत आहोत. मात्र, यातील अनेक कंपन्या या गुजरातमधील असल्याने कारवाईला अडथळा येत आहे. गुजरात मध्ये एका विशिष्ट मायक्रोन पर्यंत प्लास्टिक निर्मितीला परवानगी आहे. तरीही गुजरात मधून रेल्वे मार्गे येणाऱ्या प्लास्टिक वर आम्ही नजर ठेवून आहोत आणि त्यावर सातत्याने कारवाई करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आर अँड सी प्लांट बंद करणार –
रस्ते किंवा अन्य बांधणीसाठी रेडिमेड काँक्रीट तयार करणाऱ्या कंपन्यांचे आर अँड सी प्लांट जर नियमांचे उल्लंघन करत असतील आणि प्रदूषण वाढवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आम्ही दिला आहे. ज्या कंपन्यांना तीन महिन्यांची नोटीस देऊनही त्यांनी अद्याप कायद्याचे पालन केले नाही अशांचे प्लांट बंद करण्याची कारवाई आम्ही करत असल्याचे सिद्धेश कदम यांनी सांगितले.
स्मशानभूमीच्या चिमण्या अद्ययावत करणार –
मुंबईतील अनेक स्मशानभूमी या नागरी वस्तीत आहेत. स्मशानभूमी जुन्या असल्याने त्यांच्या चिमण्या या कमी उंचीच्या आहेत तर त्यांच्या सभोवताली उंच टॉवर निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्मशानभूमीच्या चिमण्यांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी चिमणीची उंची वाढवणे त्याला फिल्टर लावणे किंवा त्या गॅस आधारित तयार करणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले.
सांडपाण्यावर प्रक्रिया हाच उपाय –
अनेक शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी थेट नदीत अथवा समुद्रात सोडले जाते. त्यावर प्रक्रिया न झाल्याने प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. मुंबईतील समुद्राचे पाणी सुद्धा काळे दिसत असून हे केवळ सांडपाण्यामुळे झाले असल्याचे कदम म्हणाले. त्यासाठी आता मुंबई नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे आणि कोल्हापूर या महानगरपालिकांना भेट देऊन त्यांनी आपले सांडपाणी थेट न सोडता त्यावर प्रक्रिया करून सोडावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. साठी आधी काय करता येईल म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
———————————————————————————————






