मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांभोवती आता जोरदार राजकीय हालचाल सुरू झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच होणार आहेत. यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेशही जारी केले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एक मोठी राजकीय भूमिका समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार आहे.
आगामी निवडणुकीत भाजपविरोधात व्यापक आघाडी उभी राहण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) समन्वय यामुळे अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही मोठे राजकीय महत्त्व आहे. राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीत सत्ता राखण्यासाठी किंवा काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार यांची ही भूमिका महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात कोणते नवे समीकरण घडवते, याकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
——————————————————————————————-



