पनवेल : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शेतकरी कामगार पक्षाचा ( शेकाप ) ७८ वा वर्धापन दिन यंदा पनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शशिकांत शिंदे देखील या कार्यक्रमात मंचावर उपस्थित होते. राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर, अगदी शेजारी बसलेले दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नवीन पनवेलमध्ये पार पडलेल्या या मेळाव्याने केवळ पक्षाच्या इतिहासाची आठवण करून दिली नाही, तर आगामी राजकीय समीकरणांना नवे वळण देण्याची चिन्हेही दाखवली आहेत. येत्या काही दिवसांत पनवेल महानगरपालिका आणि रायगड जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या मंचावरील एकत्रित उपस्थितीचा अर्थ काय ? महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याच्या शक्यता वाढत आहेत का ? शेकाप यामध्ये सेतू म्हणून भूमिका बजावणार का ? अशा प्रश्नांनी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही काळात थोडाफार सुसंवाद सुरू झाल्याचे संकेतही यापूर्वी मिळाले होते. त्यामुळे शेकापच्या निमित्ताने या दोन नेत्यांचा संवाद अधिक दृढ होऊन आगामी निवडणुकांमध्ये युती होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेकापच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ” राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो, पण परप्रांतीयांना मराठी शिकवण्याचा विचार करत नाही. मग मी संकुचित कसा?” असा सवाल करत त्यांनी गुजरातचे उदाहरण दिले.
गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, जमीन घेण्यास मर्यादा आहेत, मग महाराष्ट्रात स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण करण्याची भूमिका घेणं चुकीचं कसं? असा सवाल करत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “गुजरातमधून २० हजार बिहारींना हाकलणारा भाजपचा आमदार होता, मग तेव्हा संकुचितपणा नव्हता का?” असा सवालही त्यांनी केला.
अटक करून दाखवाच – राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्यावरूनही राज्य सरकारला थेट आव्हान दिलं. कोणत्याही प्रकल्पाला विरोध केला की ‘अर्बन नक्षल’ म्हणत अटक केली जाते, असं सांगत त्यांनी म्हणाले, ” एकदा अटक करून दाखवाच. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग येऊ देणार नाही.”
रायगडचा विचार करा – भूतकाळातील आठवणी सांगताना राज ठाकरे म्हणाले की, पक्षाचं नाही, तर रायगड सारख्या जिल्ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. “रायगडच्या जमिनी कुठं जात आहेत, याकडे लक्ष द्या,” असं आवाहन त्यांनी जयंत पाटील यांना केलं.