प्रसारमाध्यम : अमोल शिंगे
तणाव ही एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक आणि भावनिक प्रतिसाद म्हणजे ‘तणाव’ होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव’ असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. माणसावरील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतो; त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो. संथगतीने मृत्यूकडे नेणारी अशी ही व्याधी आहे. सध्या हाच तणाव प्रामुख्याने आपल्या कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस विभागात मानसिक तणाव घुसखोरी करून पोलिस कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करू पाहत आहे. याच तणावाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कित्येक आत्महत्या केलेल्या आपण पहिल्या आहेत. आपल्या समाजाचे सामाजिक स्वास्थ टिकवून ठेवणाऱ्या आपल्या पोलिस बांधवांचे मात्र मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडत चाललंय. पोलिस विभागातील वाढता तणाव लक्षात घेऊन त्यांना तणाव व्यवस्थापना संदर्भात योग्य मार्गदर्शन देण्याचे अतिशय गरजेचे आहे.
२०१८ ते २०२२ या कालावधीत, CAPF मध्ये एकूण ६५४ आत्महत्या नोंदवण्यात आल्या. यामध्ये प्रमुख दलांतील आत्महत्या खालीलप्रमाणे आहेत:
- सीमा सुरक्षा दल (BSF): १७४
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF): ८९
- सशस्त्र सीमा बल (SSB): 64
- भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP): ५४
- आसाम रायफल्स: ४३
- राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG): ३
- केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF): २३०
- यातील प्रत्येकाची आत्महत्या करण्याची कारणे वेगवेगळी आणि वैयक्तिक आहेत पण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार या आत्महत्यांमागे तणाव हाच प्रमुख घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर पोलिस कर्मचारी वाढत्या कामाच्या तणावामुळे वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांनी ग्रस्त होत असल्याचे चित्र आपल्या समोर येत आहे. याच अहवालानुसार मुंबईत १४९ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी वेगवेगळ्या आजारांनी मरण पावल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४१ पोलिसांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे. अशी परिस्थिती पाहता पोलिसांमधील हा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा प्रयत्न करण्यापूर्वी पोलिस विभागातील तणावाची करणे शोधणे सर्वात महत्वाचे ठरेल.
सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आणि या परिस्थितीत पार पाडायची पोलिसांची जबाबदारी हे पोलिस विभागातील तणावाचे प्रमुख कारण आहे. सामाजिक दंगली असतील, या दंगलीच्या अनुशंघाने बदलणारी राजकीय परिस्थिती आणि त्यातून येणारा राजकीय दबाव यामुळे पोलिसांचे जीवन तणाव ग्रस्त बनत चालले आहे. राहिला वेतनाचा प्रश्न, तो २०११ मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पोलिसांचे वेतन बऱ्यापैकी सुधारले. आयपीएस अधिकाऱ्यांसह अगदी सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षकांच्या वेतनातही चांगलीच वाढ झाली. पोलीस सेवेत रुजू झालेला शिपाई २९ ते ३४ हजार रुपये, तर उपनिरीक्षक ४० हजारांच्या घरात पोहोचला. पूर्वीच्या तुलनेत शिपाई ते उपनिरीक्षकाला त्यातल्या त्यात मानाचे वेतन मिळू लागले; परंतु कामाचे तास, रिक्त पदांमुळे वाढणारा अतिरिक्त ताण, येनकेनप्रकारेण रद्द होणारी साप्ताहिक सुट्टी, सेवानिवासस्थानांची खुराडे तसेच प्रवासात जाणारा वेळ आदी बाबींमुळे वाढलेल्या वेतनाचे सुखही उपभोगता आलेले नाही, अशी भावना पोलिसांनी बोलून दाखविली आहे.
अशी परिस्थिती पाहता सामाजिक स्वास्थ टिकवणाऱ्या आपल्या पोलिस बांधवांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी पोलिस विभागात तणाव व्यवस्थापन या विषयी योग मार्गदर्शन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयतन होणे अतिशय गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे डॅशिंग पोलिस अधिकारी हिमांशू रॉय सारख्या पोलिस अधिकाऱ्याने केलेली आत्महत्या आपल्या समोरील एक ताजे उदाहरण आहे. जर हिमांशू रॉय सारखे पोलिस अधिकारी मानसिक तणावाखाली आत्महत्या करत असतील तर हा पोलिस खात्यातील तणाव किती जिवघेणा असेल याची प्रचीती देतो.



