कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गेले कित्येक महिने शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पैश्याच्या प्रतीक्षेत होते. आता या संदर्भातीलच एक चांगली बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. आता ही प्रतिक्षासंपली आहे. या योजनेचे दोन हजार रुपये २ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्याकडून चालवली जाते. या योजनेची सुरुवात फेब्रुवारी २०१९ ला करण्यात आली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना १९ हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. देशभरातील सुमारे १० कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची रक्कम १९ व्या हप्त्याद्वारे देण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात ६ हजार रुपयांची मदत केली जाते. दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचा वेळ असतो. १९ व्या हप्त्याची रक्कम २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. आता 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात २ ऑगस्टला पाठवली जाणार आहे. महाराष्ट्रातील ९३ लाख , 25 हजार, ७७४ लाभार्थ्यांना १९ व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी अद्याप नाही
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली होती. त्या योजनेतून देखील शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
———————————————————————————————



