पाटण्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या आग्रहामुळे, हिंदू धर्माचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून राममोहन राॅय यांना काशीला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदान्त, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारसमधे वास्तव्य केले. त्यानंतर ते बौद्धधर्माचा अभ्यास करण्यासाठी बनारसला व नंतर तिबेटमध्ये गेले. पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी ‘वेदान्त’ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी ‘वेदान्त’ ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.
घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. त्यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे पटेनासे झाले आणि ते घर सोडून निघून गेले.
राॅय यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात-उल-अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.
सामाजिक आणि धार्मिक सुधारणा :
राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद केली. विधवा विवाहास समर्थन दिले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून समाजाला सांगितले. त्यांनी १८२८ साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला. याचबरोबर एकेश्वरवादाचा प्रचारही केला.
शैक्षणिक आणि पत्रकारितेतील योगदान :
रॉय यांनी पश्चिमी शिक्षणपद्धती (विज्ञान, गणित, तर्कशास्त्र इ.) भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. हिंदू कॉलेज (१८१७) आणि ब्राह्मो समाज विद्यालये स्थापण्यात त्यांचा सहभाग होता. इंग्रजी आणि स्थानिक भाषांमध्ये शिक्षणाची सुरुवात केली.त्यांनी इंग्रजी शिक्षणाचे समर्थन केले, कारण त्यांना वाटत होते की आधुनिक ज्ञान हे भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. रॉय यांनी ‘आत्मीय सभा’ (१८१५) नावाची एक सभा स्थापन केली, ज्यातून ब्राह्मो समाजाचा उगम झाला. त्यांनी ‘संवाद कौमुदी’ (बंगालीतून) आणि ‘मिरात-उल-अखबार’ (फारसीतून) हे वृत्तपत्र सुरू केली. ‘समाचार दुर्दिन’, ‘मिरात-उल-अखबार’, ‘बंगदूत’ यांसारख्या वर्तमानपत्रांद्वारे सामाजिक जागृती केली.
याचबरोबर रॉय यांनी ब्रिटिश संसदेपुढे भारतीय समाजातील अडचणी मांडल्या. आधुनिक शिक्षणपद्धती, विज्ञान, तर्कशास्त्र यांचा पुरस्कार केला. धर्मात सुधारणा, नैतिकतेचा प्रचार केला. इग्लंडला जाऊन भारतीयांच्या हक्कासाठी लढा दिला.
राजा राममोहन रॉय यांनी काळाच्या फार पुढे जाऊन काम केले. ते बुद्धीने तल्लख होते. शिक्षण, लेखन, सामाजिक सुधारणासाठी भविष्याचा वेध व सामाजिक सुधानासाठी प्रचार यासाठी तल्लख बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.



