कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारताच्या शिक्षण आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातील सर्वात महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडूतील तिरुत्तनी येथे एका साध्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची ओढ होती. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान विषयात उच्च शिक्षण घेतले आणि या क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप निर्माण केली. त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विषयी…
तत्त्वज्ञानातील योगदान
डॉ. राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञानाचे जागतिक व्याख्याते मानले जातात. त्यांनी उपनिषदं, भगवद्गीता आणि वेदांत तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन करून त्याची ओळख पाश्चात्त्य जगाला करून दिली. त्यांच्या लेखनातून भारतीय तत्त्वज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. The Philosophy of Rabindranath Tagore आणि Indian Philosophy यांसारखी त्यांची पुस्तके आजही मार्गदर्शक ठरतात.
शिक्षक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणे, त्यांना विचारांची दिशा देणे आणि जीवनमूल्ये शिकवणे हेच त्यांचे ध्येय होते. शिक्षक व्यवसायाला त्यांनी केवळ नोकरी नव्हे तर समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचे कार्य मानले. त्यामुळेच ते आजही ‘आदर्श शिक्षक’ म्हणून स्मरणात आहेत.
राजकीय व राजनैतिक कार्य
शिक्षणक्षेत्रातील योगदानानंतर डॉ. राधाकृष्णन यांना सार्वजनिक जीवनातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या.
-
१९४९ ते १९५२ या काळात त्यांनी सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य केले.
-
१९५२ साली ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती झाले.
-
१९६२ मध्ये ते भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.



