कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जगभरातील प्रमुख तेल उत्पादक देशांच्या संघटनेने, म्हणजेच ओपेक आणि त्याच्या सहयोगी देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज ५.४७ लाख बॅरलने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जागतिक बाजारात तेलाच्या वाढत्या मागणीचा विचार करून घेण्यात आला असून त्यामुळे आगामी काळात पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओपेक संघटनेत सध्या १२ सदस्य देश आहेत. त्यामध्ये व्हेनेझुएला, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, नायजेरिया, लिबिया, कुवेत, इराण, इराक, ग्याबोन, इक्वेटोरीयल गिनी, अंगोला, अल्जेरिया हे देश आहेत. या देशांनी काही महिन्यापासून कच्चे तेल उत्पादनात कपात केली होती. यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्या होत्या.
ओपेक देशांनी परत तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा उत्पादनवाढीचा निर्णय कायम राहिला आणि मागणी-पुरवठ्याचे प्रमाण स्थिर राहिले, तर पुढील काही आठवड्यांत किमतींमध्ये घट होऊ शकते. मात्र, भूराजकीय परिस्थिती, चलनवाढ, आणि हवामान बदल यांचा देखील यावर परिणाम होऊ शकतो.
भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्यास, भारतात इंधन दरात काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. याचा सामान्य ग्राहक, वाहतूक, कृषी व उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल.
——————————————————————————————–



