कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता स्वतःच्या मालकीच्या जागांवर पेट्रोल आणि डिझेल विक्री केंद्रे सुरू करणार आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यभरातील विविध ठिकाणी एसटी महामंडळाच्या जागांवर व्यावसायिक तत्त्वावर हे पंप सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक गरजेनुसार आणि वाहतूक प्रवाह लक्षात घेऊन स्थानांची निवड केली जाणार आहे.
सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी महामंडळ आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी विविध मार्ग शोधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच महामंडळाच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळेल.सध्या राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे सोयीस्कर नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांच्या कडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एसटीच्या बसेस साठी डिझेल इंधनाचे वितरण होते. अर्थात , पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाच्या पाठीशी आहे.”
‘इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांशी एस टी महामंडळ व्यावसायिक भागीदारीचा करार करेल. अर्थात , हा करार एका अर्थाने केंद्र आणि राज्य शासनाच्या दरम्यान होत असल्यामुळे मिळणाऱ्य उत्पन्नाच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहील, असेही सरनाईक यांनी सांगितले.
या पंपांवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी इंधन विक्रीसह, एसटीच्या बसगाड्यांनाही इंधनपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे इंधनखरेदी खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे.
————————————————————————————–