बारमाही पर्यटनाची राजधानी

धार्मिक वारशापलीकडचे कोल्हापूर

0
211
Kolhapur district is now moving towards a new tourism option.
Google search engine
कृष्णात चौगले : कोल्हापूर

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, समृद्ध इतिहास आणि निसर्गसंपदेमुळे प्रसिद्ध असलेला कोल्हापूर जिल्हा आता पर्यटनाच्या नव्या पर्यायाकडे वाटचाल करत आहे. पारंपरिक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या पलीकडे साहसी, कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या संकल्पना जिल्ह्यात जोर पकडू लागल्या आहेत. डोंगरकडा, सदाहरित जंगलाचा भाग, सुपीक शेती आणि सांस्कृतिक वैभव यांच्या संगमातून उभे राहत असलेले हे पर्यटनाचे नवे पर्याय केवळ रोमांचक अनुभव देत नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी उभारी आणि ग्रामीण समाजाला आत्मनिर्भरतेचा मार्गही दाखवत आहे.

धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आता पर्यटनाच्या खूप संधी आहेत. मात्र, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. व्यवसाय म्हणून याचा विचार केल्यास एकूणच अनेक क्षेत्रांना याचा फायदा मिळू शकतो. यातून काही नवीन उद्योजकांच्या कल्पकतेमुळे साहसी, कृषी आणि ग्रामीण पर्यटन या तिन्ही क्षेत्रांना जिल्ह्याच्या वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे अनोखी चालना मिळत आहे. यामुळे पर्यटकांना नवीन अनुभवांची मेजवानी तर मिळतेच, पण स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मितीचे मोठे दालनही खुले झाले आहे.

साहसी पर्यटनाचा उगम
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या कोल्हापूरला साहसी पर्यटनासाठी निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. पन्हाळा, विशाळगड, रांगणा यांसारखे ऐतिहासिक किल्ले तसेच गगनबावडा, राधानगरी, मसाई पठार, दाजीपूर अभयारण्य यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे ट्रेकिंग, रॉक क्लायंबिंग, जंगलसफारी आणि निसर्ग भ्रमंतीसाठी प्रसिद्ध होत आहेत. आठवड्याच्या शेवटी येथे पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. पॅराग्लायडिंग, झिपलाइनिंग, सायकलिंग यांसारखे उपक्रमही लोकप्रिय होत असून, मसाई पठार पायथ्याला वनखात्याच्या पुढाकाराने उभारलेल्या व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कमुळे पर्यटकांना थरारक अनुभव मिळत आहेत. प्रचितगडापासून पारगडापर्यंतचा संपूर्ण पश्चिम घाट परिसर जमीन, आकाश आणि पाणी या तिन्ही माध्यमांतून साहसी उपक्रमांसाठी आदर्श ठरत आहे.
मसाई पठार विविध रंगांच्या फुलांनी सजले आहे.
कृषी पर्यटनाचा वाढता विस्तार

समृद्ध शेतीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कृषी पर्यटनाची संकल्पना शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभाची नवी दिशा ठरते आहे. रेंदाळ, हातकणंगले, गारगोटी या भागात सेंद्रिय शेती, गूळ उत्पादन प्रक्रिया, भात शेती, फळबागांची ओळख आणि दुग्धव्यवसायाचे प्रात्यक्षिक दाखवणारी कृषी पर्यटन केंद्रे उभारली जात आहेत. शहरी पर्यटकांना येथे प्रत्यक्ष शेतकामाचा अनुभव घेता येतो, पारंपरिक पद्धतीने बनवलेले गावरान जेवण चाखता येते, तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळते. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची प्रेरणा मिळते.

ग्रामीण पर्यटनाची जादू
ग्रामीण भागातूनही अशा प्रकारचे पर्यटनाचे केंद्रे उभी केली जात आहेत.
गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले आणि चंदगड या तालुक्यांमध्ये सुरू झालेल्या ग्रामीण पर्यटन प्रकल्पांमुळे पर्यटकांना गावांच्या परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीचे प्रत्यक्ष दर्शन घडते. बैलगाडीतून गाव सफर, मातीच्या भांड्यातील पारंपरिक जेवण, पारंपरिक स्वयंपाक पद्धती, शेती आणि पशुपालनाचे प्रात्यक्षिक, तसेच स्थानिक जत्रा आणि लोकनृत्यांचा अनुभव पर्यटकांना अविस्मरणीय ठरतो. शहरातील पर्यटकांना ग्रामीण वातावरणाचा जवळून परिचय देण्यात ही प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्था
या तिन्ही पर्यटन प्रकारांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. ट्रेकिंग मार्गदर्शक, कृषी पर्यटन समन्वयक, हस्तकला विक्रेते, पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करणारे, होमस्टे चालक, स्थानिक वाहतूक सेवा यांना यामुळे नवी संधी उपलब्ध होत आहे. पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीतील पदार्थ, कोल्हापुरी मसाले, गूळ, ऊस प्रक्रिया उत्पादने यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. स्थानिक हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे.
धार्मिक आणि ऐतिहासिक ओळखी पलीकडे कोल्हापूर पर्यटन आता साहस, शेती आणि ग्रामीण संस्कृती या तिन्ही अंगांनी आपली नवी ओळख तयार करत आहे. निसर्गसंपन्न भौगोलिक स्थिती, परंपरागत शेतीचा वारसा आणि समृद्ध लोकसंस्कृती यांच्या संगमामुळे कोल्हापूर विकसित होत आहे.

निसर्गाची अद्भुत देणगी, शतकांपासून चालत आलेला सांस्कृतिक वारसा आणि प्रगत शेती यांचा संगम कोल्हापूरला पर्यटनाचा खरा खजिना बनवतो. साहसाचा थरार, शेताची ओल, आणि ग्रामीण जीवनाची ओळख अशा विविध अनुभवांची मेजवानी देत कोल्हापूर महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आपली स्वतंत्र आणि वैविध्यपूर्ण ओळख निर्माण करत आहे. या नव्या पर्यटन वाटांनी स्थानिकांना रोजगार, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा नवा अध्याय लिहिण्याची संधी दिली असून, कोल्हापूर लवकरच देशाच्या आघाडीच्या बहुआयामी पर्यटन केंद्रांपैकी एक म्हणून उजळून निघणार आहे.

——————————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here