प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत संपून महिना उलटला असतानाच महाराष्ट्र परिवहन विभाग आता अॅक्शन मोडमध्ये आला आहे. १८ फेब्रुवारीपासून ज्या वाहनांवर HSRP नंबरप्लेट नसेल, त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत.
वाहनांच्या सुरक्षिततेसाठी HSRP अनिवार्य करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर १,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मात्र, ज्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी HSRP साठी नोंदणी केली आहे, पण अद्याप प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनधारकांना प्रशासनाकडून १५ दिवसांचा ‘ग्रेस पिरीयड’ देण्यात आला आहे. “वेळेत नोंदणी केलेल्या नागरिकांना संधी मिळावी, म्हणूनच १८ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे भिमनवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती विशेष चिंताजनक असल्याचे चित्र आहे. या भागात एकूण २४,२८,५८९ पात्र वाहने असून, त्यापैकी केवळ ८,५७,२०९ वाहनधारकांनी HSRP साठी नोंदणी केली आहे. म्हणजेच जवळपास ६५ टक्के वाहने अद्यापही जुन्याच नंबर प्लेटवर धावत आहेत. राज्यभरात १ कोटीहून अधिक वाहने अजूनही HSRP शिवाय असून, अंतिम मुदत उलटूनही वाहनधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तपासणीत केवळ नंबर प्लेटपुरतीच कारवाई मर्यादित राहणार नाही. HSRP नसल्यामुळे वाहन थांबवण्यात आल्यास, नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा, पीयूसी प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांचीही तपासणी केली जाणार आहे. यापैकी कोणतेही कागदपत्र अपूर्ण किंवा अनुपलब्ध आढळल्यास दंडाची रक्कम अधिक असू शकते.
वाहनधारकांनी संभाव्य दंड टाळण्यासाठी तातडीने HSRP बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे






