कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या मंत्र्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. अलीकडेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी संबंधित वादानंतर, शिंदेंनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना “माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा कामात लक्ष केंद्रित करा” असा सल्ला दिला आहे.
शिंदे यांनी एका अंतर्गत बैठकीत स्पष्ट शब्दांत सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता, जनतेच्या प्रश्नांवर ठोस काम करणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, “आमच्या कामातूनच जनता आमच्यावर विश्वास ठेवेल. त्यामुळे वादविवाद आणि प्रसिद्धीपेक्षा काम करणे महत्त्वाची आहे.”
माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणानंतर काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत सापडल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना आपापल्या खात्याच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, शिंदे गट आगामी निवडणुकांमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मंत्र्यांनी कामगिरीतूनच आपली जबाबदारी सिद्ध करावी, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अप्रत्यक्ष शिंदेंनी मंत्र्यांना अडीच वर्षाच्या कालावधीची आठवण करून देत मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे दोन दिवसापासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास २५ मिनिटं एकांतात चर्चा झाली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनासोबत घेऊनही एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली.






