प्रसारमध्यम l दिग्विजय माळकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
भेटीचा तपशील आणि राजकीय चर्चा: दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान मोदींनी एनडीए खासदारांना संबोधित केले. या बैठकीत मोदींनी अजित पवारांना श्रद्धांजली देखील वाहिली. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी मोदी आणि शाहांची ५-६ मिनिटे स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली. जरी भेटीचा अधिकृत तपशील समोर आला नसला, तरी लवकरच सुनेत्रा पवार यादेखील पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीत जाणार असल्याची चर्चा आहे.
विलिनीकरण आणि अध्यक्षपदावर पटेलांचे स्पष्टीकरण: अजित पवारांच्या पश्चात दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार का? या प्रश्नावर प्रफुल पटेल यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, “अध्यक्षपदाचा निर्णय माझ्याशिवाय होईल,” ज्यावरून सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची धुरा सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
टीकाकारांना प्रत्युत्तर: अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने काही स्तरांतून टीका झाली होती. यावर पटेलांनी भाष्य करताना सांगितले की, सुनेत्रा पवारांनी किती काळ दुःख मानावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी टीकाकारांना चोख उत्तर दिले.





