कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले. मनपाच्या पद्मभूषण वि.स. खांडेकर विद्यालयांमध्ये शाळा प्रवेशोत्सवा प्रसंगी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश वाळवेकर होते.

के. मंजुलक्ष्मी – मराठीमध्ये चांगली प्रगती कराच पण त्याचबरोबर इंग्लिश व अन्य भाषांमध्ये संभाषण करता आले पाहिजे, त्यासाठी त्या भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, त्या भाषेमध्ये बोलण्याचा सराव करा, चुकले तरी बोलण्याचे धाडस कायम ठेवा. आपली कौटुंबिक परिस्थिती व आपण राहतो तो परिसर कोठेही असला तरीही आपण मेहनत, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मोठे होऊ शकतो. नुकताच आपण यूपीएससी परीक्षेच्या निकालात पाहिले आहे; आदिवासी भागातील अनेक तरुणांनी या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. याप्रमाणे सर्वांनी मेहनत घेतल्यास, मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केल्यास आपण निश्चितच आपले ध्येय गाठू शकतो. आपण मोठे होऊ शकतो. शाळेनेही विद्यार्थ्यांच्या मध्ये विविध कौशल्य विकसित होण्यासाठी उपक्रम राबवावेत असे आव्हान करून सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना नवीन वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शाळेमध्ये काही अडचणी असल्यास त्या संदर्भामध्ये मुख्याध्यापकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा असे सांगितले.
के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, गणवेश, स्कूलबॅग, शूज, पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्कार शिबिर ही घेण्यात आले. यामध्ये संदीप पाटील यांनी पालकांनी आपल्या मुलांशी कशाप्रकारे वागावे विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आचरण ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले. मर्दानी खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक ही करून दाखविले. तसेच प्रशासकांच्या हस्ते संगणक लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, महेश वाळवेकर , मुख्याध्यापक द्रोणाचार्य पाटील, अनिता पाटील, शिवशंभू गाटे, सागर सारंग, श्रीकांत देसाई, दयानंद जगदाळे, पवन शर्मा तसेच पालक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर सावंत यांनी केले व आभार किस्किंदा मुंडे यांनी मांनले.
——————————————————————————————-