Agriculture Minister Dattatray Bharne has clarified that as soon as the rains stop, assistance will be provided to farmers by conducting Panchnamas immediately.
अकोला : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून पाऊस थांबताच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तीन दिवसीय शिवार फेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, “ राज्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.” तसेच युरियाच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना यासंदर्भात ‘गुड न्यूज’ दिली जाईल, असंही त्यांनी आश्वासन दिलं.
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या शिवार फेरीला या वर्षी ४३ वे वर्ष लागले आहे. पुढील तीन दिवसांपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील अकराही जिल्ह्यांमधील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत. २० एकर क्षेत्रावर ११२ खरीप पिके, २७ भाजीपाला पिके, ५९ फुलवर्गीय पिके यांसह एकूण २१२ पिक वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी थेट प्रात्यक्षिकाद्वारे पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दरम्यान, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील रिक्त पदांबाबत पुढील एक-दोन महिन्यांत सरकार ठोस निर्णय घेणार असल्याचेही भरणे यांनी सांगितले. अकोला विद्यापीठातील रिक्त पदांवरून विद्यापीठ प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवर लवकरच तोडगा काढला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितले की, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकार लवकरच बांबूंच्या कुंपणाची योजना आणणार आहे. मात्र बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
या सर्व घडामोडींमुळे पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून तातडीची कार्यवाही होणार असल्याचे संकेत मिळत असून, शिवारफेरीतून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना नव्या संधींचे दरवाजेही उघडणार आहेत.