कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
काल जोरदार असलेल्या पावसाने आज बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. काल उत्तररात्रीही पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळीही पावसाचा जोर कमी होता. राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. पंचगंगा नदीने आज इशारा पातळी (कोल्हापुरातील राजाराम बंधारा येथे २० ऑगस्ट सकाळी ७ वाजता ३९.५ फुट पाणी पातळी) ओलांडली आहे. मुंबईपासून सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम राहणार आहे. हवामान विभागाने कोल्हापूर घाट क्षेत्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील ४८ तासांत पावसानं जोरदार हजेरी लावली आणि मुंबईपासून ते अगदी कोकणापर्यंत सर्वत्रच या पावसानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ठाणे, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसानं लावलेल्या हजेरीमुळं वाहतुकीवर परिणाम झालेच तर, नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळंसुद्धा बहुतांश गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला.
मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या पावसानं पुन्हा एकदा २६ जुलैची आठवण करून दिली. मात्र मंगळवारी सायंकाळनंतर मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर, उपनगरांत पावसाची संततधार असल्याचं पाहायला मिळालं. ठाणे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असल्याचं स्पष्ट होत आहे.
पावसाची कधीही न पाहिलेली रुपं गेल्या २४ तासांमध्ये पाहायला मिळाली आणि हे सत्र राज्यात पुढील २४ तासांसाठी सुरूच राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये कमी दाबाता पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. परिणामस्वरुप महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकापर्यंत पावसाचा जबर मारा पाहायला मिळत आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाट क्षेत्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, आयएमडीनं वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भ मराठवाड्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्यानं मोसमी पावसाळी वाऱ्यांचे प्रवाह आणखी तीव्र होत असून, मुंबईपासून सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम राहणार आहे.
—————————————————————————————————-



