सोलापूर : विशेष प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्राला भक्तीमय करण्याऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात दमदार प्रवेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात पालखी सोहळा जिल्ह्यात आल्यानंतर ठिकठिकाणी फुलांची उधळण, स्वागत आणि वारकऱ्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे.
सध्या पालखी सोहळा माढा तालुक्यात असून, पुढील मुक्काम कुर्डुवाडी येथे होणार आहे. याठिकाणी रात्रीचा थांबा असून, उद्या पहाटे पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. कुर्डुवाडी येथे स्थानिक स्तरावर स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा सजावट, स्वागत कमानी, पाणपोया, वैद्यकीय सुविधा अशा सर्व बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असून, जिल्ह्यात ‘पंढरीच्या वाटेवर’ असे भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. याठिकाणी अनेक भाविक, स्थानिक नागरिक आणि विविध संस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अन्नदान, पाण्याची व्यवस्था, औषधोपचार आणि अन्य सुविधा दिल्या जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मुक्कामानंतर पालखीचा अंतिम टप्पा अधिक जवळ येणार आहे. त्यामुळे ‘पांडुरंग भेटीची ओढ’ आता अधिक तीव्र होत चालली आहे.
कुर्डुवाडी मुक्कामानंतर पालखीचा पुढील प्रवास पंढरपूरकडे होणार असून, आषाढी एकादशीला पंढरपुरात महापूजेसह सोहळा पार पडणार आहे.
———————————————————————————————–