Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

 

दिवासी संस्कृतीचा आत्मा आणि वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या ‘तारपा’ वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे, पालघर जिल्ह्याचे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा होताच पालघर जिल्ह्यासह संपूर्ण कला विश्वात आनंदाची लाट उसळली आहे.

वारली संस्कृतीचा जागतिक सन्मान

भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा या अतिदुर्गम गावातील रहिवासी असून ते वारली आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी तारपा या पारंपरिक आदिवासी वाद्याच्या माध्यमातून वारली संस्कृतीचे जतन आणि संवर्धन केले आहे. त्यांच्या या निस्सीम कलासाधनेची दखल घेत भारत सरकारने कला क्षेत्रातील योगदानासाठी हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

हलाखीतून उंच भरारी

आज ८९ वर्षांचे असलेले भिकल्या धिंडा अत्यंत गरीब आणि खडतर परिस्थितीत वाढले. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आपली कला कधीही सोडली नाही. तारपा हे वाजवण्यासाठी अत्यंत दमसासाची (Breath Control) गरज असते, असे कठीण वाद्य असूनही ते आजही तितक्याच ताकदीने आणि तन्मयतेने तारपा वादन करतात.

पिढीजात परंपरेचा वारसा

भिकल्या धिंडा यांच्या कुटुंबात सुमारे १५० वर्षांपासून तारपा वादनाची परंपरा आहे. आजोबा आणि वडिलांकडून प्रेरणा घेत त्यांनी लहानपणापासूनच ही कला आत्मसात केली. केवळ स्वतः वादन न करता नवीन पिढीला तारपा शिकवून ही कला लुप्त होऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या घरी सात फूट उंचीचा तारपा तसेच दहा पेक्षा अधिक तारपा वाद्य संग्रही आहेत.

तारपा : आदिवासींच्या हृदयाची स्पंदने

तारपा हे केवळ वाद्य नसून वारली समाजाची ओळख आहे. सुकलेला भोपळा, बांबू आणि ताडाच्या पानांपासून तयार होणाऱ्या या वाद्याला दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या आदिवासी नृत्यांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भिकल्या धिंडा यांच्या रूपाने आज या परंपरेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

पुरस्कारांची परंपरा

भिकल्या धिंडा यांना यापूर्वी राज्य सांस्कृतिक पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, आदिवासी भूषण पुरस्कार, तारपा शिरोमणी पुरस्कार, मायमराठी कलासंगम यांसह २० पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात जल्लोष

पद्मश्री पुरस्काराची घोषणा होताच त्यांच्या गावात ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
“हा केवळ भिकल्या दादांचा सन्मान नसून, संपूर्ण आदिवासी संस्कृतीचा आणि कष्टकरी लोककलाकारांचा सन्मान आहे,” अशा भावना स्थानिक कलाकारांनी व्यक्त केल्या.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भिकल्या धिंडा यांनीही आनंद व्यक्त करत समाधानाची भावना व्यक्त केली.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here