कुरुंदवाड : अनिल जासुद
शिरोळ येथील पी.वाय. कुंभार यांनी आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत चक्क सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेतला आहे. त्यांना कुटुंबापुरता दररोज ताजा भाजीपाला मिळत आहे. भाजीपालासाठी बनविलेल्या शेडवर मातीच्या कुंडीतून निसर्गातील पक्षांसाठी निवारा,अन्नधान्य व पाण्याची सोय करुन पक्षीप्रेम जपले आहे.
पी. वाय. कुंभार (काका) हे सांगली जिल्ह्यातील देवर्डे गावचे रहिवाशी. ते व्यवसायासाठी शिरोळ तालुक्यात येऊन येथेच स्थायिक झाले आहेत. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे लहानपणापासून शेतीची आवड आहे. या आवडीमुळे व्यवसायातून सवड काढून त्यांनी आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत सेद्रिंय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेतला आहे. यामध्ये भोपळा, पडवळ, दोडका, भेंडी, गवारी, चवाळी, वांगी, वरणा, कारले,टोमँटो, मिरची, आळूची पाने इत्यादी भाजीपाला लावला आहे. तसेच या भाजीपाल्यासाठी उभारलेले शेडवर मातीचे मडके, घागर ठेवून त्यामध्ये पिंजार ठेवले आहे. पक्षांसाठी निवारा, अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. यामुळे दररोज अगदी पहाटेपासून विविध पक्षी येथे धान्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी येतात. पक्षी मोकळ्या निसर्गाच्या वातावरणात फिरावेत, त्यांना बंदिस्त करून ठेवू नये असा त्यांचा उद्देश आहे.
कुंभार काका हे शिरोळ तालूक्यातील एक यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांचे शिरोळ व कुरुंदवाड येथे ग्राहक बझार व भव्य माॅल आहेत. याचे ते स्वतः मॅनेजमेंट पाहतात आणि यात त्यांची दोन्ही मुले अमोल आणि प्रमोद सहकुटुंब त्यांना मदत करतात. मोठे व्यापारी असले तरी सेंद्रिय शेतीची आवड असल्याने त्यांनी संपूर्ण व्यवसायातुनही सवड काढून टेरेसवर भाजीपाला फुलवला आहे.
आजकाल बाजारात विविध रसायनयुक्त भाजीपाला मिळत आहे. यामुळे विविध आजाराना आमत्रंण मिळत आहे. यापासून बचावासाठी स्वतःच्या घराच्या टेरेसवर सेंद्रिय पध्दतीने भाजीपाला घेतल्यास कुटुंबापुरता ताजा भाजीपाला मिळु शकतो. टेरेसवरील सेद्रिंय भाजीपाला पाहण्यासाठी आसपासचे शेजारी, मित्र परिवार, नातेवाईक येत आहेत. अशाचप्रकारे आपल्याही घरी सेंद्रिंय पद्धतीने भाजीपाला घेणार असल्याचे मनोदय व्यक्त करुन जात असल्याचे पी. वाय. कुंभार (काका)यांनी सांगितले.
पर्यावरणपुर्वक घरगुती गणेशोत्सव