कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात यंदा मान्सूनने दमदार हजेरी लावली असून राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असून पुढील पाच दिवसही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. १७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत सर्वाधिक पाऊस मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी इतका झाला आहे. त्यापाठोपाठ ठाणे (७३.७ मिमी), मुंबई शहर (६२.९ मिमी), रायगड (५४.१ मिमी) आणि पालघर (४९.७ मिमी) या जिल्ह्यांनाही चांगल्या पावसाने झोडपलं आहे.
या पावसामुळे काही भागांमध्ये वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला असून काही महामार्गांवर पाणी साचल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रीय झाला असून सध्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद होत आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस सुखद संकेत देणारा असून खरीप हंगामाच्या तयारीसाठी हे हवामान उपयुक्त ठरणार आहे.
जोरदार पावसामुळे राज्यातील काही भागांत जनजीवनावर परिणाम झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत असून, प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
वाहतुकीवरही मोठा परिणाम :
-
मुंबई-गोवा महामार्गावर, खेड तालुक्यातील वळंजवडी येथे रस्त्याला भेगा पडल्याने वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू ठेवण्यात येत आहे.
-
सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने पर्यायी रस्ता खचला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील कोकण व घाटमाथ्यांतील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे निर्देश :
-
नदी परिसरात आणि निचऱ्याच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतत स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहावे.
-
पावसामुळे भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा संभव आहे, त्यामुळे काळजी घ्यावी.
-
शाळा, कार्यालये आणि बाजारपेठांमध्ये वाहतुकीच्या अडथळ्यांचा विचार करून योजना आखावी.
——————————————————————————-