कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यभरात शेतकरी आणि नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते आज पंढरपूरला रवाना झाले आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना ( ठाकरे गट ) नेते विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणी साकडे घालणार आहेत.
आज महाविकास आघाडीकडून पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी यावी आणि महामार्ग रद्द व्हावा यासाठी साकडे घालण्यात येणार आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी येथे महामार्ग संदर्भात होणारी भूधारकांची महत्त्वाची बैठक प्रशासनाने अचानक रद्द केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळी व अंबाजोगाई तालुक्यातील भूधारक बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र, अपरिहार्य कारणास्तव ही बैठक रद्द करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांनी अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. या भागातील शेतकऱ्यांनी याआधीच या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे. “कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही,” असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
या वेळी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी यावी, महामार्ग रद्द व्हावा आणि राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील विविध भागांत या महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन उभं राहत आहे.
➤ आंदोलनाच्या प्रमुख घडामोडी :
-
पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणी महामार्ग रद्दसाठी साकडे
-
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथून शेतकरी पंढरपूरकडे रवाना
-
परळी येथील भूधारकांची बैठक प्रशासनाने रद्द केली
-
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला जोरदार विरोध
-
महाविकास आघाडी, स्वाभिमानी संघटना आक्रमक
राज्य शासन या आंदोलनाची गंभीर दखल घेणार का, आणि शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
———————————————————————————————