नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ( एनसीईआरटी ) ने त्यांच्या नवीन अभ्यासक्रमात भारतीय जवानांची शौर्यगाथा ‘ऑपरेशन सिंदूर’ समाविष्ट केली आहे. इयत्ता तिसरीपासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ हल्ला, युद्ध आणि प्रत्युत्तर एवढंच नव्हे, तर भारताची राजकीय भूमिका, शांतता व सुरक्षेसाठी उचललेलं पाऊल आणि शांततेसाठी भारताचा ठाम आग्रह याबाबत सविस्तर माहिती शिकवली जाणार आहे.
पहलगाचा उल्लेख
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटक मारले गेले होते. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या आणि राजकीय नेतृत्वाच्या आदेशावर हा कट रचला गेला होता. पाकिस्तानने मात्र या आरोपांना नाकारलं.
ऑपरेशन सिंदूर : भारताचं प्रत्युत्तर
या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु, ही मोहीम केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर शांततेसाठी व स्वसंरक्षणासाठी भारताने उचललेलं पाऊल होतं. ही मोहीम भारताच्या दृढनिश्चयाचं आणि सन्मानाचं प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे.
७ मे २०२५ रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित केलं. एकूण नऊ तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ते केवळ २२ मिनिटांत उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारताने केला आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला इजा झाली नाही.
‘ सिंदूर ’ या नावामागचा भावनिक दुवा
या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आलं. शहिदांच्या पत्नींनी देशासाठी केलेल्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी हे नाव देण्यात आल्याचं अभ्यासक्रमात नमूद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लष्करी धैर्याबरोबरच सामाजिक जबाबदारी आणि कुटुंबीयांच्या त्यागाबाबतही शिकवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना काय शिकवलं जाणार ?
-
भारताची राजकीय भूमिका व शांततेसाठीचा ठाम आग्रह
-
राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेली पावले
-
पहलगाम हल्ला आणि त्यामागील पाकिस्तानचा कट
-
ऑपरेशन सिंदूरचे लष्करी व तांत्रिक यश
-
शहिदांच्या कुटुंबीयांचा त्याग आणि त्यांचा सन्मान
एनसीईआरटीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच भारताच्या संरक्षण, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाविषयी सर्वांगीण समज वाढवणारा ठरणार आहे.
—————————————————————————————