मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील लाखो महिलांसाठी एक मोठी आर्थिक संधी उपलब्ध झाली आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदती पलीकडे आता महिलांना स्वतःची महिला नागरी सहकारी पतसंस्था सुरू करता येणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींनी एकत्र येऊन महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. यामुळे महिलांना बचत व कर्ज व्यवस्थापनाचे साधन उपलब्ध होणार असून, त्यातून त्यांचा आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग अधिकच सुकर होईल.
काय आहेत अटी व शर्ती ?
सहकार विभागाने पतसंस्था नोंदणीसाठी काही महत्त्वाच्या अटी व शर्ती जाहीर केल्या आहेत :
-
पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद हे ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे.
-
किमान २०० महिला सभासद असाव्यात.
-
संस्थेचा मुख्य उद्देश महिलांना बचत व कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि उद्योजकतेला चालना देणे हा असावा.
-
संस्थेची प्रारंभिक भागभांडवल, नियामक शुल्क व अन्य कागदपत्रे पूर्ण करणे आवश्यक आहे.
-
संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता राखावी लागेल.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पाऊल
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, “महिलांच्या हातात आर्थिक सशक्ततेची चावी देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पुढच्या टप्प्यात महिलांना स्वतःची पतसंस्था स्थापन करण्याची संधी देऊन आम्ही त्यांना आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ देत आहोत.”
काय मिळणार लाभ?
या निर्णयामुळे महिलांना अल्प व्याजदरात कर्ज मिळू शकते, बचतीची सवय लागेल, महिला गटांमध्ये आर्थिक व्यवहार सुलभ होतील, तसेच छोट्या व्यवसायांसाठी भांडवल मिळू शकते. याशिवाय, ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी स्थानिक सहकार अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांसाठी ही एक ऐतिहासिक संधी मानली जात असून, राज्यातील लाखो बहिणी आता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
————————————————————————————-



