नाशिक : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली असून विद्यार्थी आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवेश घेऊ शकतील. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ही वाढीव मुदत लागू आहे.
विद्यापीठाच्या १२ विद्याशाखांमधील १३५ पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच व्यावसायिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणक्रम यंदा नव्याने सुरू करण्यात आले आहेत. विशेषतः संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, कृषी तसेच व्यावसायिक क्षेत्रातील बदलत्या गरजांचा विचार करून डेटा ॲनालिटिक्स, आयबीएम सर्टिफिकेट, डिजिटल फोटोग्राफी, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, श्वानपालक प्रबोधन, सौर व पवनऊर्जा आदी अभिनव शिक्षणक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ( यूजीसी ) नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोबत मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षणाद्वारे अतिरिक्त पदवी घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच एका वेळी दोन पदव्या पूर्ण करण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांना खुला आहे.
कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने शिक्षणक्रमांचे स्वरूप अधिक व्यापक व लवचिक केले आहे. घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय असल्याने नोकरी करणारे, व्यवसायिक, गृहिणी किंवा ज्यांना नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.
प्रवेश घेण्यासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा नजीकच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
—————————————————————————————————-