कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सामाजिक दायित्व निधी, शासनाचे अनुदान, केंद्र व राज्य शासनाच्या योजना यांतून मोठ्या प्रमाणात निधी उभारुन क्रीडा विकासाला चालना द्या. जिल्हाधिकारी, महानगरपालिकेच्या आयुक्त, क्रीडा विभाग व जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी समन्वय साधून जिल्ह्याचा ‘क्रीडा विकास आराखडा’ तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी क्रीडा प्रतिष्ठाण सोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी क्रीडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, उपअभियंता हेमा जोशी, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार विविध खेळांशी संबंधित संस्था व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. याचसाठी हॉकी स्टेडियम, गांधी मैदान, शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय, सासणे ग्राउंड अशी मैदाने व शहरातील जलतरण तलावांना आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन शहरातील मैदाने व जलतरण तलाव खेळाडू व सर्वसामान्य युवकांसाठी लवकरात लवकर खुली करावीत.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सी.एस.आर. निधी मधून क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. राज्य व जिल्ह्यातील औद्यागिक प्रतिष्ठाने, कंपन्यांचे सहकार्य घेवून निधी उभारण्याचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्याचा क्रीडा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढील 20 ते 25 वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे. खेळ निहाय तांत्रिक बाबी, प्रशिक्षणाला आवश्यक सुविधा, तसेच क्रीडा क्षेत्रात स्पोर्ट्स सायन्सचे महत्व या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. आगामी काळात विभागीय क्रीडा संकुलात क्रीडा विषयक सोयी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. स्पोर्ट्स हॉस्टेल, अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक, फिफा स्टँडर्ड फुटबॉल मैदान तयार करण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल, असे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी सांगितले.
—————————————————————————————————–