कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रवासासाठी एकच सामायिक तिकीट देण्याच्या प्रणालीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच हे ॲप प्रवासीसेवेसाठी सुरू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भूमिगत मेट्रो-३च्या टप्पा-२अ चा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला. त्यावेळी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महामुंबईत सध्या एकूण चार मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्या आहेत. अन्य सहा मार्गिकांची उभारणी सुरू आहे. यानुसार दोन वर्षांत मुंबईत १०० किमीचे मेट्रो जाळे कार्यान्वित होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘या वर्षाअखेरपर्यंत ५० किमी व २०२६च्या अखेरपर्यंत आणखी ५० किमी लांबीची मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल’, असे फडणवीस यांनी सांगितले. देशातील सर्वांत मोठे मेट्रो मार्गिकांचे जाळे मुंबईत उभे राहत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘आमचे पूर्ण सहकार्य’
मेट्रो-३ ही मार्गिका जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या (जायका) आर्थिक सहकार्याने उभी राहत आहे. ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या मार्गिकेसाठी ‘जायका’ने २१,२८०.४५ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘मेट्रो ३ हे भारतात शाश्वत वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याच्या आमच्या आश्वासनाचे उदाहरण आहे. यासंबंधी भारत सरकार व ही मार्गिका विकसित करणारी एमएमआरसीएल यांना आमचे पूर्ण सहकार्य असल्याचे अधोरेखित होत आहे,’ असे ‘जायका इंडिया’चे मुख्य प्रतिनिधी ताकेऊची ताकूरो यांनी सांगितले.