On the first day of Navratri, after the afternoon aarti, a special puja was held of Ambabai in the form of Lakshmi sitting on a lotus.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शारदीय नवरात्रोत्सवाला कोल्हापुरात भाविकांच्या जल्लोषात सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी तब्बल सव्वा लाख भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देशभरातून आलेल्या भक्तांनी देवीच्या चरणी लीन होऊन नवरात्राची सुरुवात मंगलमय केली.
सोमवारी घरोघरी घटस्थापना असल्याने सकाळी मंदिर परिसर तुलनेने शांत होता; मात्र दुपारनंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा फुलू लागल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या आकडेवारीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत १ लाख १८ हजार ४१७ भाविकांनी दर्शन घेतले होते, तर त्यानंतरही रांगांचा ओघ अखंड सुरू होता.
भाविक रांगेतून दर्शन घेत होते. रात्री उशिरापर्यंत रांगेचा ओघ अखंड सुरू होता.
रात्री साडेनऊच्या सुमारास मंदिर परिसरात अंबाबाईची सुवर्ण पालखी मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी सुवर्ण पालखीला फुलांच्या कलशाकृती सजावटीने सजवण्यात आले होते. परिसरातील फुल व्यावसायिकांकडून दररोज नव्या आकारातील सजावट केली जाते.
पारंपरिक भालदार, चोपदार, रोषण नाईक यांचा शाही लवाजमा, टाळ-मृदंगाचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि “ उदं गं अंबे उदं ”, “अंबा माता की जय ” च्या घोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला. पालखीवर फुलांची उधळण, मानाच्या नायकिणींची देवीगीते, तसेच नेत्रदीपक आतषबाजीने सोहळ्याला रंगत आणली.
सोहळ्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती गरुड मंडपातील सदरेवर विराजमान झाली. येथेही भाविकांनी गानसेवेतून देवीला वंदन केले. त्यानंतर उत्सवमूर्ती गाभाऱ्यात नेण्यात आली आणि शेजारतीनंतर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच झालेला हा नेत्रदीपक पालखी सोहळा आणि भाविकांचा प्रचंड उत्साह पाहून संपूर्ण कोल्हापूर शहर “अंबाबाईच्या जयघोषाने” दुमदुमून गेले.