राधानगरी : प्रतिनिधी
राजर्षी शाहू स्मृती केंद्र समिती राधानगरी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राधानगरी धरण स्थळावरील या सोहळ्यासाठी यशराज राजे छत्रपती उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राधानगरी धरणातील पाण्याचे कलशपूजन करण्यात आले.
राजर्षी शाहू स्मृती केंद्र समितीचे अध्यक्ष अभिजीत तायशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.”जरी मी या समितीचा अध्यक्ष असलो किंवा माझ्या जिल्हा परिषद सदसत्त्वाच्या कार्यकाळात हा शाहूंचा पूर्णाकृती पुतळा राधानगरी धरणावर बसवण्यात आला असला तरीसुद्धा याचे सगळे श्रेय राधानगरीच्या जनतेला आहे. राधानगरीच्या जनतेने मला संधी दिली म्हणून मी ही विकास काम करू शकलो. शाहू महाराजांची प्रेरणा आणि राधानगरी जनतेचा आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी आहे याचा सार्थ अभिमान आहे”, अशी भावना अभिजीत तायशेटे यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ.प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी उपस्थित सर्वांना शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्यांचा आढावा घेऊन शाहूंच्या प्रेरणादायी विचारांची उजळणी केली. या कार्यक्रमाच्या दरम्यान राधानगरीची कन्या गायत्री शिंदे या मुलीने लिहलेल्या ‘शाहू कन्या’ या पुस्तकाबद्दल व सिद्धार्थ कांबळे यांचे स्पर्धा परीक्षेतील यश याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी खऱ्या अर्थाने आकर्षण ठरले ते धुंदवडे गावचे लेझीम पथक आणि हलगी वाद्य. या लेझीम पथकाने आजच्या कार्यक्रमाला एका उत्सवाचे रूप आणले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते विश्वास पाटील यांनी केले.
आज झालेल्या कार्यक्रमासाठी राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख, गटशिक्षणाधिकारी मेंगाणे, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण पारकर, गटशिक्षण अधिकारी लालासो मोहिते, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अजित पोवार, फेजिवडे ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा कासार, सुरेश बचाटे, सतीश फणसे, दादासो सांगावकर, विश्वास राऊत, ए. डी. पाटील, राजेंद्र चव्हाण, संदीप पाटील, शिवाजी चौगले, निऊंगरे सर, कृष्णात साळवी, हसन राऊत, गणी चोचे, फारुख नावळेकर, वसंत पाटील, पांडू पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
———————————————————————————–



