राधानगरी : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या दिवसात पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी पाणी स्वच्छ करूनच आणि उकळूनच प्यावे, असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी यांनी व्यक्त केले. अशा काळात साथीचे रोग, विशेषतः अतिसाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.ते पंचायत समिती राधानगरीच्या वतीने ‘अतिसार थांबवा’ या जनजागृती अभियानात बोलत होते.
राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिसार थांबवा’ या जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी यांनी उपस्थित तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले अतिसारामुळे शरीरात पाणी आणि क्षार कमी होतात. त्यामुळे रुग्ण अशक्त, व्याकुळ होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी अगोदरच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.तर नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात ताजे आणि सकस अन्न घ्या, उकळून, गाळून पाणी प्या आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखा.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेट्टी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. “आजारी पडल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजारच होऊ नये, यासाठीची जीवनशैली ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास पंचायत समितीतील अधिकारी, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियानाद्वारे घराघरात स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पोचविण्यात येत आहे.
डॉ सुहास खेडकर, डॉ.मनिष पाटील, डॉ.हेमा भारती, संतोष ननावरे तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक,गट प्रवर्तक आणि तालुका स्तरावरील सर्व सहकारी कर्मचारी उपस्थितीत होते.






